अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा..!
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत?
•भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
•प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
•दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014)
मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.