१ सप्टेंबरपासून पाचवी-आठवीच्या
शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरता येणार
महाराष्ट्र राज्य - परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी येत्या १ सप्टेंबरपासून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. परिषदेकडून या वर्षी एक जुलैपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, पण तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू होत आहे.
फेब्रुवारी २०२३ च्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची टक्केवारी घटल्याने यंदा परीक्षेची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन परिषदेने केले होते. या निकालात काही जिल्ह्यांमध्ये मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थीसुद्धा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले नाहीत. तसेच अनेक जिल्ह्यांचा निकाल पाच ते दहा टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळेच शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता या प्रक्रियेला नियोजनानुसार दोन महिने विलंब झाला आहे. परिषदेकडून आता १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत.