क्लायमेट
(जलवायुमान)
म्हणजे काय?
क्लायमेट
आणि वेदर या दोन इंग्रजी शब्दांचा हवामान हा एकच अर्थ मराठी भाषेत दिला जातो.
इंग्रजीमध्ये या शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. त्यामुळे क्लायमेट या इंग्रजी
शब्दासाठी जलवायुमान आणि वेदर या शब्दासाठी हवामान असे शब्द आपण वापरणार आहोत.
एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारी सर्व ऋतूंमधील हवामानांची प्रदीर्घकालीन सरासरी
स्थिती कायम राहते. ही स्थिती क्लायमेट किंवा जलवायुमान या शब्दाने दर्शविली जाते.
याउलट हवामानाची तासातासाला, दिवसादिवसाला किंवा महिन्या महिन्याला बदलणारी स्थिती वेदर किंवा हवामान
या शब्दाने दर्शविण्यात येते. हवामानाची तात्कालिक किंवा अल्पकालीन स्थिती असा
वेदर या शब्दाचा अर्थ आहे.
सरासरी तापमान आणि पाऊस ही जलवायुमानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
त्याशिवाय दैनंदिन आणि ऋतूनुसार होणाऱ्या तापमान आणि पाऊस यांच्या बदलांनाही
महत्त्व आहे. जलवायुमान हे व्यक्तिमत्त्वासारखे आहे. मुंबईचे जलवायुमान आणि लंडनचे
जलवायुमान त्या ठिकाणी असणारी प्रदीर्घकालीन हवामानाची खास वैशिष्ट्ये आहेत. काही
वेळा मात्र नेहमीच्या जलवायुमानात अचानक बदल होते २६ जुलै २००५ रोजी मुंबईत पडलेला
धुवाधार पाऊस हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
सामान्यतः विशिष्ट ठिकाणी असणारे जलवायुमान स्थिर असते. त्यामुळे त्या
ठिकाणी निवास करणारे सजीव प्राणी त्याच्याशी जुळवून घेतात. पृथ्वीवर विविध
प्रकारची जलवायुमाने असल्यामुळेच जैववैविध्य निर्माण झाले आहे. संस्कृती आणि
सभ्यता यांच्या विकासातही जलवायुमानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या
जलवायुमानाच्या प्रकारात लोक राहतात तेथील परिस्थितीनुसार त्यांच्या चालीरिती व
पोशाख असतो.
आधुनिक शेतकरीही आपल्याला स्थानिक जलवायुमानाशी सुसंगत ठेवतो. त्यानुसार
अपेक्षित पावसाच्या प्रमाणानुसार पिकांची लागवड करतो. पीक तयार होण्यासाठी वेळेचेही त्याला भान ठेवावे लागते.
अनेक संस्कृतींमधील सणही वर्षभरात होणाऱ्या जलवायुमानाच्या बदलानुसार आखलेले आहेत.
ज्या वेळी जलवायुमान नेहमीचा आकृतिबंध पाळत नाही त्या वेळी अवर्षण, अतिवर्षण अशांसारखे नैसर्गिक धोके
उभे राहतात.
हवामान दररोज बदलते, जलवायुमान मात्र मंदगतीने बदलण्यासाठी सहस्रावधी वर्षे लागतात. पृथ्वीच्या अक्षाचा बदलता कल आणि तिचा बदलता भ्रमणमार्ग यांचा परिणाम संघपणे जलवायुमानावर होत असतो. काही कारणाने सौर ऊर्जा थोडीफार कमी-जास्त झाली, तर पृथ्वीच्या सरासरी तापमानातही बदल होईल. सूर्यावरील कृष्णवर्णी डागांच्या संख्येचाही परिणाम पृथ्वीवरील जलवायुमानावर होतो, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. उदाहरणार्थ, सोळाव्या व सतराव्या शतकांच्या मध्यंतरी लघु हिमयुगाचे पृथ्वीवर आगमन झाले होते. त्या काळात सूर्यावरील कृष्णवर्णी डागांची संख्या न्यूनतम होती. मानवी उपद्व्यापांमुळेही पृथ्वीचे जलवायुमान बदलत चालले आहे.
जागतिक
तापमानवृद्धी हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. गेल्या शतकातील उच्च तापमान वर्ष २००५
होते, ही गोष्ट मोठी
बोलकी आहे. पूर्वीही जलवायुमानात बदल झाला होता, पण त्याची गती संथ होती. आज मानवी उपद्व्यापांमुळे
जलवायुमानात वेगाने बदल होत आहे.