TILIMILI EPISODES STARTS AT 21ST SEPTEMBER टिलीमिली कार्यक्रम २१ सप्टेंबर पासून सुरु




विषय: पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर 'दूरदर्शन' महामालिका - "टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून 'सह्याद्री' वाहिनीवर- दीड कोटी विद्यार्थ्यांना लाभ 

                 कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्येच डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे "ज्ञानगंगा" या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक १४ जून २०२१ पासून दैनिक ५ तासांकरीता सुरु करण्यात आले आले. शासनाच्या याच उपक्रमाला सहयोग देण्यासाठी व अशा अपवादात्मक परिस्थितीत 'एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन' या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या 'सह्याद्री' वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे पुनर्प्रक्षेपण मोफत देण्याचे ठरविले आहे. मागील शैक्षणिक वर्षात “टिलीमिली” ही मालिका विद्यार्थ्यान मध्ये अत्यंत लोकप्रिय झाली. 
         
         आपल्या राज्यात सर्वदूर राहणाच्या सुमारे दीड कोटी 'टिलींना व मिलींना' अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या निःशुल्क सेवेचा लाभ घेतला तसा याही वर्षी घेता येईल. ही मालिका त्यांच्या पालकांनीही मुलांसोबत जरूर बघावी व त्यात सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी मुलांबरोबर घरी व परिसरात करून शिकावे. "टिलीमिली" ही मालिका 'बालभारती'च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले गेले आहेत, त्यांच्याभोवती छोट्या छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वतःची अर्थबांधणी स्वतःच करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वतःच कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल, अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रक्रिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वतः शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्वास वाढवेल व शिकायचे कसे हे शिकवेल. जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यासू मावशी व काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात व आपल्या कॉलनीतल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी कशी मदत करू शकतात हेही "टिलीमिली" मालिका जाताजाता दाखवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाडीवस्ती-शिक्षण', 'कॉलनी-शिक्षण' किंवा 'मोहल्ला-तालिम' देणारे 'ज्ञानरचना सुलभक' राज्यात यंदाही पुढे यावेत अशी अपेक्षा आहे. पहिली ते आठवी च्या प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित दररोज १० एपिसोड्स यानुसार प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू होईल.                                                            
"टिलीमिली" कार्यक्रमाचे वेळापत्रक :
           
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. दूरदर्शन च्या 'सह्याद्री' वाहिनी वरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७४, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व एमकेसीएल परिवारा तर्फे प्रसारित होणार्या “टिलीमिली” या महामालिकेची माहिती आपण आपल्या परिसारातील पहिली ते आठवी इयत्तेतील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांन पर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.