पृथ्वीवर हवेच्या दाबाचे पट्टे कसे तयार होतात?
हवामानखात्याकडून प्रसिद्ध होणाऱ्या नकाशात हवेचा समान दाब असणारी स्थाने रेषांनी जोडलेली दाखविण्यात येतात. या रेषांना 'आयसोबार' असे नाव आहे. सामान्यतः ४ मिलीबार दाबाच्या फरकाने आयसोबार रेषा दर्शविल्या जातात. ज्या आयसोबार रेषा परस्परांपासून फार दूर असतात, त्या हवेच्या दाबातील मंदगतीने होणारा बदल दर्शवितात, तर परस्परांच्या फार जवळ असणाऱ्या आयसोबार रेषा हवेच्या दाबातील जलद गतीने होणार बदल दर्शवितात. काही ठिकाणी आयसोबार रेषांना मंडलाकृती स्वरूप प्राप्त होते. सभोवतालपेक्षा उच्च दाब असणाऱ्या मंडलाकृतींना 'हाय' किंवा 'उच्च' अशी संज्ञा आहे. 'अॅन्टि सायक्लॉन' असेही त्यांचे एक नाव आहे. सभोवतालच्या दावापेक्षा कमी दाब असणाऱ्या मंडलाकृतींना 'लो' किंवा 'नीच' असे नाव आहे. त्यांना 'सायक्लॉन' या नावानेही ओळखतात.
उच्च दाब असलेल्या स्थानांच्या मध्यभागी असणारी हवा भूपृष्ठाच्या दिशेत खाली जाते. त्याच वेळी त्याच्या सभोवती असणारी हवा उत्तर गोलार्धात सव्य दिशेने क्लॉकवाइज) परिवलन करू लागते. याउलट, नीच दाब असलेल्या स्थानांच्या मध्यभागी असणारी हवा आकाशाच्या दिशेत वर चढते व त्याच वेळी सभोवतालची हवा उत्तर गोलार्धात अपसव्य दिशेत (अॅन्टि क्लॉकवाइज) परिवलन करू लागते.
एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत असणाऱ्या हवेच्या दाबातील फरकाला 'प्रेशर) ग्रेडिअन्ट' किंवा 'दाब वृद्धी' असे नाव आहे. आयसोबार रेषा परस्परांपासून जितक्या नजीक तेवढी दाबवृद्धी अधिक. हवा अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. जर दाबवृद्धी फार मोठी असेल तर हवेचा वेग जलद असतो. अर्थात आयसोबार रेषा परस्परांच्या किती नजीक आहेत यावरून वादळाची तीव्रता लक्षात येते.
साऱ्या जगभर अनेक ठिकाणी सातत्याने हवेच्या दाबाची नोंद ठेवल्यावर असे लक्षात आले की, भूपृष्ठाभोवती दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. दाबाचे पट्टे (प्रेशर) बेल्टस) ही पृथ्वीवरील अशी क्षेत्रे आहेत की, ज्या ठिकाणी सतत हवेचा दाब उच्च किंवा नीच असतो. उदाहरणार्थ, विषुववृत्तावर साऱ्या वर्षभर सूर्याचे किरण लंबरेषेत येतात. त्यामुळे विषुववृत्तावरील हवा त्याच्या उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील क्षेत्रापेक्षा अधिक तापते. त्यामुळे विषुववृत्तावर हवेचा नीच दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचे कारण विषुववृत्तावरील हवा तापून हलकी होते व ऊर्ध्व दिशेत वर चढते. ही हवा तपांबरापर्यंत (ट्रोपोस्फिअर) पोहोचली की उत्तर व दक्षिण गोलार्धात ध्रुवांच्या दिशेत पसरते. परंतु ३० अंश उत्तर व दक्षिण अक्षांशांपर्यंत पोहोचताना ती थंड होते व घन झालेली ही हवा पुन्हा भूपृष्ठाकडे खाली जाते. त्यामुळे उत्तर-दक्षिण ३० अंश अक्षांशांवर उच्च दाबाचे पट्टे तयार झाले आहेत.