11 वी CET परीक्षा रद्द (11th CET exam canceled by High Court)

 


11 वी CET परीक्षा रद्द

                     राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

                 या संदर्भात हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिला आहे की, अकरावीमध्ये प्रवेश हा दहावीत मिळालेल्या गुणानुसारच करण्यात यावा. राज्य सरकार तर्फे निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणीही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

 

 6 आठवड्यात 11 प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

               सदर याचिकेवर आज न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 28 मे 2021 रोजी जारी परिपत्रक रद्द करण्यात आलं आहे. 11  वी प्रवेशसाठी सीईटी परीक्षा होणार नसून येणाऱ्या 6 आठवड्यात 11  वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला हायकोर्टाने दिले आहे.

                      महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. या परीक्षेसाठी मंडळाच्यावतीनं पोर्टल तयार करण्यात आलं होतं. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्टला संपली आणि सीबीएसईचा दहावीचा निकाल 3 ऑगस्टला जाहीर झाल्यानं सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती.

                    मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आज झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

 

परीक्षा रद्द करण्याची मागणी का?

                सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.

web source : Internet

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.